रत्‍नागिरी जिल्हा

Payal Bhegade
14 Apr 2023
District

रत्‍नागिरी जिल्हा

रत्नागिरीच्या पश्चिमेला सहयाद्रीच्या पर्वतरांगा पहायला मिळतात. रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. रत्‍नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लहान शहर आणि रत्‍नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे शहर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. भारतरत्न आचार्य विनोबा भावे, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर हे मुळात रत्नागिरी जिल्हयातलेच!!
पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्‍नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत राय ह्याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांची मदत केली होती. विजापूरचे शासक पोत्तु श्री चेन्ना रेड्डी यांनी रत्‍नागिरीचा किल्ला बांधला. इ.स. १६७० मध्ये छत्रपती शिवाजींनी तो दुरुस्त केला. इ.स.१७२१ मध्ये रत्‍नागिरी सातारच्या छत्रपतींकडे होते. इ.स.१८१८ या वर्षी रत्‍नागिरी ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. रत्नागिरी हा जिल्हा समुद्र किनारपट्टीवर असल्यामुळे या ठिकाणी समुद्र किनारपट्टीवर व्यापारी बंदरे होती आणि तेथून राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय व्यापार होत असल्यामुळे या भागामध्ये वेगवेगळ्या देशाचे व्यापारी या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येत होते आणि त्यामुळे या भागावर अनेक विदेशी लोकांनी राज्य केले आहे.
सह्याद्रीच्या उंच शिखरांवर पूर्वी बांधलेले महिपतगड, सुभानगड, भैरवगड, प्रचितगड यांसारखे गड आहेत. प्रदेशाचा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. या प्रदेशात भरपूर पाऊस पडतो. पावसाळ्यात उतारावरून पाणलोट वाहतात व नद्यांना जाऊन मिळतात.प्रदेशात जंगले खूप असून लोकसंख्या विरळ आहे. कशेडी, कुंभार्ली व आंबा हे या विभागातील प्रमुख घाट असून त्यांमधून अनुक्रमे रायगड, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांशी दळणवळण चालते.डोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याशी जो काहीसा सपाट व पठारी भाग दिसतो, त्यालाच ‘वलाटी’ असे म्हणतात. या पट्टीत काळी व तांबडी जमीन तसेच जांभा व बेसाल्ट प्रकारचे खडक आहेत. भात हे या भागातील मुख्य पीक आहे. वलाटीच्या पश्चिमेला जो किनारपट्टीचा प्रदेश आहे त्यालाच ‘खलाटी’ असे म्हणतात.
किनारपट्टीवरील जमीन रेतीमिश्रित असून तीत प्रामुख्याने नारळाची लागवड केलेली आढळते. जिल्ह्यातील बरीचशी लोकसंख्या याच प्रदेशात केंद्रित झालेली आहे. समुद्राच्या कडेला ज्या ठिकाणी डोंगरासारखे उंच भाग आहेत, तेथे किल्ले बांधलेले दिसतात. सुवर्णदुर्ग, जयगड, रत्नदुर्ग, पूर्णगड, गोपाळगड हे अशा प्रकारचे किल्ले आहेत. रत्नदुर्ग व जयगड येथील दीपगृहे महत्त्वाची आहे.