देवगड तालुका

Payal Bhegade
26 Dec 2023
District

देवगड हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्यात ९८ गावे आहेत. तालुक्याचे मुख्यालय देवगड हे गाव अरबी समुद्रातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण किनारपट्टीवर मुंबईच्या दक्षिणेस वसले आहे. देवगडला समुद्रकिनारा, एक छोटे बंदर आहे. समुद्र किनाऱ्यावरच्या देवगड किल्ल्यावर सन १९१५ साली बांधलेले एक दीपगृह आहे.

देवगड तालुक्यातील दुसरा किल्ला विजयदुर्ग (घेरिया) हा शिलाहार राजघराण्यातील राजा भोज द्वितीय याने बांधला, त्यानंतर आदिलशाह, शिवाजी महाराज व शेवटी कान्होजी आंग्रे यांनी त्यावर राज्य केले. ब्रिटिश राज्यकर्ते, डच, पोर्तुगीज हे या किल्ल्याला त्याच्या अभेद्यपणासाठी "पूर्वेकडचे जिब्राल्टर" म्हणत.

देवगड गावाच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे मुंबई - गोवा महामार्गावरील कोकण रेल्वेवरील कणकवली आहे. कणकवली येथून देवगड-विजयदुर्गला जाण्यासाठी ऑटो-रिक्षा किंवा राज्य परिवहन बसेस मिळू शकतात. विजयदुर्गाच्या समुद्राखाली एक तटबंदी भिंत आहे. तिच्यावर शत्रूची जहाजे किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नात आपटत आणि बुडत .

देवगडचा आंबा :-
देवगड तालुका स्थानिक पातळीवर पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी जागतिक स्तरावर ओळखला जातो. देवगड तालुक्यातील शुद्ध हापूस आंब्याच्या लागवडीमुळे संपूर्ण तालुक्याचा विकास झाला आहे. येथे पिकलेला आंबा हा त्याचा सुगंध, गुळगुळीत पातळ त्वचा आणि दाट केशरी गर यांसाठी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यात अन्यत्र पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. देवगड हापूस आंब्याची अशी लोकप्रियता आहे की, विक्रेते बहुतेकदा असेच दिसणारे आंबे देवगड हापूसच्या नावाखाली पाठवून ग्राहकांची फसवणूक करतात.

देवगड येथील हापूस आंबा हा ४५,००० एकर क्षेत्रावर पिकविला जातो आणि वर्षभरात याचे चांगल्या वातावरणात उत्पादनामध्ये सुमारे ५०,००० टन उत्पादन होते. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड नावाच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भारतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. यात ७०० सदस्य असून, २०१३ साली या संस्थेस २५ वर्ष पूर्ण झाली.


अन्य माहिती : -
देवगडजवळच्या समुद्रामध्ये तसेच तालुक्‍यातील खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. या प्रदेशाचा मुख्य आहार म्हणजे तांदूळ आणि मासे.
देवगड तालुक्यातील गिर्ये येथे महाराष्ट्राचा पहिला सरकारी पवनचक्की प्रकल्प आहे.
देवगड शहरापासून १६ किमी अंतरावर ११व्या शतकातील कुणकेश्वर गावात हिंदू देवता शिवाचे एक प्राचीन मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रभरातून लोक येथे एकत्र येतात. पवनचक्कीपासून ३ किमी अंतरावर एक १६व्या शतकातील श्री देव रामेश्वराचे मंदिर, भगवान महादेवाला समर्पित आहे . मुणगे गावात देवी भगवती देवीचे मंदिर आहे. हिंदळे गावात विश्वेश्वराया आणि स्वामी कार्तिकस्वामी या देवतांची मंदिरे आहेत. तसेच गढीताम्हाणे गावात श्री रहाटेश्वरांचे मंदिर आहे. जामसांडे म्हणून ओळखले जाणारे एक छोटेसे गाव देवगडजवळ आहे. जामसांडे येथे दिर्बा देवीचे मंदिर आहे. हे अंदाजे देवगड बसस्थानकापासून ४ कि.मी. अंतरावर आहे. ज्या पर्यटकांना गोव्याचे किनारे टाळायचे आहेत त्यांच्यासाठी देवगड हळूहळू पर्यटन आकर्षण केंद्र बनत आहे. शांतपूर्ण आणि नीरव पार्श्वभूमीवर हे थिकाण कौटुंबिक सहलीसाठी योग्य आहे.

भारताची पश्चिम किनारपट्टी ही अत्यंत संवेदनशील आहे, म्हणूनच अलीकडेच भारत सरकारने देवगड दीपगृहाजवळ रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक सेन्सर बसवले आहे. २५ नॉटिकल मैलांपर्यंतच्या रिअल-टाईम पाळत ठेवण्याच्या कल्पनेसाठी निवडलेल्या ४६ पैकी देवगड हे एक स्थान आहे