दापोली तालुका

Payal Bhegade
28 Dec 2023
District

दापोली तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. दापोली शहर त्याचे मुख्यालय आहे. दापोली हे मुंबईपासून २१५ किलोमीटर (१३५ मैल) अंतरावर आहे.
दापोलीला कॅम्प दापोली असे म्हटले जाते कारण ब्रिटिशांनी दापोलीला त्यांचा शिबिराची (कॅम्प)ची स्थापना केली होती. बऱ्याच उच्च पदवी ब्रिटिश अधिकाऱ्यांची अधिकार गावे या टाऊन मधे होती. दापोलीत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे भारतातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ आहे. दापोली तालुका व शहर हे दापोली नगर परिषदेने प्रषाशित आहे. दापोली शहराची गावदेवी कालकाई देवी आहे. शहरातील काळकाईकोंड या ठिकाणी गावदेवीचे मंदिर आहे. मौजेदापोली गावची जानाई गावदेवी आहे. दापोलीला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून म्हाप्रळ-मंडणगड-पालगडमार्गे रस्ता
आहे. मंडणगड-दापोली हे अंतर 30 किलोमीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड शहरातून दापोली 35 किलोमीटर अंतरावर आहे.

१८१८ ते १८१९ च्या दरम्यान म्हणजे आजपासून जवळजवळ २०० वर्षांपूर्वी इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत कॅम्प दापोली वसवली. संपूर्ण कोकण पट्टयात दापोली कॅम्प हे तेव्हाच्या काळातले इंग्रजांचे एकमेव सुरक्षित व सोयीस्कर ठिकाण. हीच कॅम्प दापोली पुढे कोकणच्या व महाराष्ट्राच्या २०० वर्षाच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींची साक्षिदार राहिली .

दापोली शहर व ग्रामीण भाग हा सह्याद्रीच्या पायथ्याचा खेड रांगेतून वेगळा आहे. दापोली तालुक्याला सुमारे ५० किलोमीटर (३५ मैल) केलशी, बुरोंडी ते दाभोळच्या बंदरा पर्यंत समुद्र किनारा आहे. किनारपट्टी कोकणच्या ईतर भागापेक्षा सामान्य वैशिष्ट्यांमधे फारशी भिन्न आहे. प्रमुख नद्या उत्तरेला भारजा आणि दक्षिणेला वशिष्ठी आहे. जोगेळे नावाची एक छोटी नदी आहे जी सारंग गावात समुद्राला मिळते. शहराच्या ८०० फुट (२४० मिटर)च्या समुद्रसपाटीवर आहे. अरबी समुद्रापासून ८ किलोमीटर अंतरावर आहे.

हिरव्यागार डोंगररांगांवर ठिपक्यासारखी दिसणारी घरे, मोकळी हवा आणि शहरातून फेरफटका करतांना दिसणारे विविध रंगी पुष्पसौंदर्य हे दापोली शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहराचे सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षण आहे. थंडगार हवेमुळे हे शहर 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात दापोली परिसराची भटकंती करताना बहावा, पेव, दयाळू, अग्निशिखा, मधूनच डोकविणारी विविधरंगी जास्वंद अशा अनेक फुलांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. समुद्र सपाटीपासून साधारण आठशे फूट उंचीवर असलेले हे शहर इंग्रजांच्या काळात 'दापोली कॅम्प' म्हणून परिचित होते. सुंदर समुद्र किनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात येणारे 'सी गल' पक्षी, याच दरम्यान मधूनच घडणारे डॉल्फीनचे दर्शन, समुद्र किनारचा मासोळी बाजार, ऐतिहासिक गड-किल्ले आणि इमारतींसाठी दापोली तालुका प्रसिद्ध आहे. अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची खाण म्हणून हा परिसर ओळखला जातो.
मंडणगडहून कोकण भ्रमंती सुरू केल्यास वेळास-केळशी-आंजर्ले-मुरुडमार्गेदेखील दापोलीला येणे शक्य आहे. वेळास-दापोली हा दोन तासांचा प्रवास आहे .

दापोली शहर :-
आसूद गावापासून दापोली केवळ 6 किलोमीटर अंतरावर आहे. दापोली थंड हवचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. दापोलीला आल्यावर कोकण कृषी विद्यापीठाला आवर्जुन भेट द्यावी. 1972 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठात कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक नवे प्रयोग अचंभीत करणारे तेवढेच शेतीत रुची असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. विद्यापीठातील विविध उद्यानांची रचनादेखील तेवढीच सुंदर आहे. विद्यापीठाच्या माहिती केंद्रात कृषी प्रदर्शन पाहता येते. दापोली परिसरातील फळबागांचा उपयोग करून अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे विकसीत करण्यात आली आहेत. या पर्यटन केंद्रांमधून झाडावरून नारळ काढणे, जलक्रीडा, बैलगाडीची सफर, कलम करणे, नारळ सोलणे, चूलीवर स्वयंपाक करणे, रात्री जाखडी खेळणे, कोकणी भोजन प्रकार आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कृषी पर्यटन केंद्रात दिवस घालविल्यास 'कोकणी लाईफस्टाईल'ची मजा लुटता येते.