गेले ते दिस ऱ्हवले ते आठवणी.

Payal Bhegade
18 May 2024
Blog

आमचो जन्म मुंबयत (मुंबई), शाळा मुंबयत. वरसा दोन वरसानी आमका गाव दिसा.
*चाळीस वरसापूर्वी बापाशीन 'मे' महिन्यात गावाक जावचा नाव काढला की आमका काय आनंद होय...*
लगेच ही बातमी चाळभर पसरा.
मगे एस. टी. रिझर्वेशनचो पेच उभो ऱ्हवा. मग चुलते बॉम्बे सेंट्रल डेपोत राती झोपान तिकिटी काढुचो पराक्रम करित. कधी रातरानी फूल झाल्याना सकळच्या जादा गाडियेची तिकटा काढुची लागत.
*(मगे प्रवासा दरम्यान गरम्यान जिवाची कायली होय.)*
*गावाक जावचो दिस जवळ येय तसो आवरा आवरिक जोर चढा..* आउस-बापूस आमका नये कपडे, गंजी, नया टावेल, आजयेक नववारी पाताळ अशी कपड्यांची खरेदी करीत...
*माळयावरली ट्रंक खाली उतरा, जोडीस लालबागच्या नारळवाल्या कडसून आनलले दोन बारदाणाचे गोणी.*
सामानाची खरेदी होय. कोणाक पाव किलो सुपारी तंबाखू, कोणाक चाय पावडर, तर कोणाक म्हैसूर पाकचो पुडो. ल्हान पोरावाल्यांच्या घरात ग्लुकोजचो पुडो आणि रावळ गावची चाकलेटा.
मगे गावाक जाताना पोळयो/घावने, हिरवी चटनी वांगडा एस.टी.डेपोच्या कळकट कॅंटीनात बसान खाव.
*तेवा कधी एकदा गावाक पोचतय असा झालेला असायचा.*
*गावाक पाय लागल्यार धन्य झाल्या सारख्या वाटा.* आजी/चुलती आमका पोटाशी घीत, मुके घीत.
*पटदिशी एक फेरी खळ्यातसून लोट्यार, लोट्या वरसून वळयेत, थयसून पाटल्यादाराक होय.*
मगे बावडे/लिकियेर न्हाना.
न्ह्यायरिक पेज. आंबे, गरे, जांभळा, करंदा, तोरणा, रतांबे, बोंडा चरना.
कुडाळातील कुंट्याकडची कांदा भजी म्हणजे जीव की प्राण.
घरात भट वाडलो की गोडा जेवाण तर राखण दिली मगे सागोती पोळये.
कधी आजी हौशेन घावने, रस शेवयो, टोपातला, फणसाची भाजी, बांगड्याचा कालवन करून घाली.
काजी आगीत भाजून गर खाउक घाली. फणसाचे गोटये उकडून देय.
राती लाटान/बत्येच्या उजेडात वावारणा, काजव्यांची चमचम/गाज, निजतना आजयेची(आजी ) गोधडी.
*रजा भुर्कन सरान पुन्हा मुंबई एस.टी.पकडुचो दिस कधी उजडा ता कळाच नाय...*
मगे ट्रंक आणि गोणत्यात कोणी कोणी दिलले उकडे तांदूळ, फौव, पिटी, सोला, सुकटा, भुईमुगाचे शेँगे, खाजा, कापा, खड़खडे लाडू ह्ये भेटी भरूक लागव.
ह्या वांगडा एक कलमी आंब्याचो करंडो, रसाळ आणि कापो फणस, दोन वाडवणी आणि एक चिवारेची काठी घेव.
खरच खूप छान होते ते दिवस.