दशावतार लोककलेसाठी सदैव कार्यरत

Payal Bhegade
30 Nov 2023
Blog

तेंडोलीः ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांचा जिल्ह्यातील रंगकर्मींच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विजय चव्हाण, सुहास वरुणकर, प्रा. हरिभाऊ भिसे, अनघा तेंडोलकर, मृणाल सावंत आदी उपस्थित होते.
कुडाळ, ता. ३०ः मला प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारात सिंधुदुर्गवासीयांसह माझे सर्व दशावतार सहकारी व नाट्यप्रेमींचे मोठे योगदान आहे. सातासमुद्रापार पोहोचलेली दशावतार लोककला अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यापुढेही प्रामाणिक प्रयत्न करीन, असे प्रतिपादन दशावरातातील भीष्माचार्य यशवंत तेंडोलकर यांनी केले. जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यकर्मींच्या वतीने तेंडोलकर यांचा तेंडोली येथील निवासस्थानी त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत सन्मान करण्यात आला.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा राज्य सांस्कृतिक कलारजनी पुरस्कार कुडाळ तालुक्यातील तेंडोली-हुडकुंभावाडी येथील दशावतारातील भीष्माचार्य व ज्येष्ठ कलाकार यशवंत (काका) तेंडोलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर, सेन्सॉर बोर्ड सदस्य तथा सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण, ज्येष्ठ नाट्यकर्मी अक्षरसिंधू नाट्य संस्था कणकवलीचे कार्याध्यक्ष प्रा. हरिभाऊ भिसे, कथ्थक विशारद पदवी प्राप्त नृत्यांगना मृणाल सावंत यांनी तेंडोलकर यांच्या तेंडोली येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान केला. यावेळी सरपंच अनघा तेंडोलकर, उपसरपंच संदेश प्रभू, कौशल राऊळ, मीनाक्षी वेंगुर्लेकर, साक्षी राऊळ, सुवर्णा तेंडोलकर, ग्रामसेवक आत्माराम परब आदी उपस्थित होते.
तेंडोलकर म्हणाले, "काही वर्षांपूर्वी दशावतार प्रवास हा अतिशय खडतर होता. त्यावेळी कोणतीही दळणवळणाची साधने नसल्याने डोक्यावर बोजा घेऊन कड्याकपारींतून वाटचाल करून ही कला जिवंत ठेवली. आता प्रत्येक मंडळाकडे गाड्या आल्या; पण त्यावेळी जो संघटितपणा होता, तो आता राहिलेला नाही. हा संघटितपणा टिकवून राहण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. युवा कलाकार आज दशावतार लोककलेला पुढे नेत आहेत. आजच्या शंभर दशावतार कलाकारांपैकी माझे सत्तर शिष्य असून, लोकराजा (कै.) सुधीर कलिंगण हा माझाच शिष्य होता. पहिला ट्रिकसिनचा प्रयोग मी २५ वर्षांपूर्वी माझ्या तेंडोली गावात सर्वांच्या सहकार्याने संयुक्त दशावतारातून केला. त्याची फलश्रुती आज आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यावेळी वर्षातील पाच ते सहा महिने दशावतार चालायचे; मात्र आता सहा महिने संयुक्त दशावतार व सहा महिने पारंपरिक दशावतार चालत आहे. हे मी दिलेल्या योगदानाचे फलित असून, याचा सार्थ अभिमान आहे. कलाकारांनी संघटित झाले पाहिजे, शिकले पाहिजे. अजूनही दशावतार लोककलेवर पुस्तक निघाले नाही, ते होणे आवश्यक आहे. त्यामुळे ही कला वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. युवा कलाकारांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोककला पुढे नेली पाहिजे. नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. माझ्या नाट्यप्रवासाची सुरुवात माझ्या तेंडोली गावातील अमरकला दशावतार नाट्यमंडळातून झाली. त्यानंतर अनेक नाट्यमंडळात कामे केली, काही दशावतार मंडळे चालविली. ज्येष्ठ लोककलाकार (कै.) बाबी कलिंगण यांच्यासमवेतही मी काम केल्याचा अभिमान वाटतो."

तेंडोलकरांचा पुरस्कार कलाकारांना प्रेरणादायी
विजय चव्हाण म्हणाले, "काका तेंडोलकर यांची दशावतारातील भीष्माचार्य म्हणून ओळख आहे. त्यांना राज्याचा मिळालेला दशावतार लोककलेतील पुरस्कार हा आम्हा सर्वांसाठी उर्जा देणारा आहे. येथील लोककलेला पुढे नेण्यासाठी व जिल्ह्यातील सर्व नाट्यमंडळे संघटित होण्यासाठी भविष्यात त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरणार आहे. गेली अनेक वर्षे दशावतार कला जोपासताना त्यांनी विविध भूमिका साकारून त्या अजरामर केल्या. आज सत्तरीच्या दारातही ते त्याच जोशात रंगमंचावर सक्रिय आहेत. संयुक्त दशावतार संचातही ते काम करतात. त्यांनी अनेक पौराणिक व काल्पनिक कथानके लिहिली असून, त्यांच्या या योगदानाचा युवा कलाकारांनी आदर्श घ्यावा."