कोकणातला हापूस आंबा जगवणं ही काळाची गरज आहे

Payal Bhegade
13 Oct 2023
Blog

हवामानातील चढ-उतारांमुळे कोकणचा राजा हापूस आंब्याचं भवितव्य धोक्यात आल्याचं दापोली कृषी विद्यापीठाच्या संशोधकांच्या लक्षात आलं. त्यावर उपाय म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग करायला सुरूवात केलीय. 2022मध्ये कोकणातील आंब्याचं उत्पादन सरासरीपेक्षा 20 टक्के कमी आलं, असं रत्नागिरीचे कृषी पर्यवेक्षक विजय निकम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. या पार्श्वभूमीवर कोकणातल्या बागायतदारांच्या मनात हापूस आंबा संपेल की काय अशी धाकधूक आहे. कारण पुढल्या वर्षी चांगला आंबा करायचा असेल तर आता जूनला पाऊस सुरू झाल्यानंतर आंब्याच्या बागांमध्ये काम सुरू होतं.
"आंबा जगवणं ही काळाची गरज आहे. आंबा संपून जाईल ही भीती वाटते. याला कारणीभूत आहे पर्यावरण." जूनच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंब्याची शेवटची पेटी बाजारात पाठवण्यासाठी पॅक करताना दापोलीच्या गुडघे गावातील आंबा व्यापारी मिलिंद दांडेकर सांगत होते.
यंदा निसर्गाने जरा साथ दिली. पण, पुढे काय? याची सतत धास्ती कोकणातील शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आहे. याचं कारण हवामानाचा लहरीपणा, वातावरणात होणारे चढ-उतार, लांबलेला पाऊस आणि तापमानात होणारी वाढ याचा हापूस आंब्यावर मोठा परिणाम होतोय.
यावर्षीच्या आंब्याच्या सिझनमध्ये प्रचंड उष्णतेमुळे आंबा गळून पडण्याचं प्रमाण अधिक होतं. तर पाऊस लांबल्यामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोग वाढले आणि तयार झालेला आंबा खराब निघत होता. तसंच बागेत फळमाशा मोठ्या प्रमाणात असल्याने पिकांचं नुकसान झालं, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक विजय निकम यांनी दिली.
जून ते ऑगस्टचा कालावधी आंबा बागायतदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात शेतकऱ्यांनी झाडांची निगा राखली, खतांचा योग्य वापर केला तर हवामानातील चढ-उतारातही कोकणचा राजा हापूस आंब्याला जगवणं शक्य होणार आहे, असं दापोली कृषी विद्यापीठातील संशोधकांना वाटतंय.आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन घेण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत. याबाबत आम्ही दापोलीच्या कृषी विद्यापीठातील संशोधकांशी चर्चा केली.

जून ते ऑगस्ट दरम्यान काय करावं?
--- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंब्याचं उत्पादन होतं. मे महिन्याच्या अखेरीस हंगाम संपला की आंबा बागायतदार पुन्हा जोमानं कामाला लागतो. संशोधक सांगतात, याच काळात आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी झाडांची निगा राखण्यावर भर दिला पाहिजे. तर, आंब्याचं उत्पादन चांगलं घेणं शक्य आहे.

डॉ. भरत साळवी हे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हॉर्टिकल्चर विभागाचे प्रमुख आणि सहअधीष्ठाता आहेत. गेल्या 16 वर्षांपासून ते आंब्याला जगवण्यासाठी संशोधन करत आहेत. जून ते ऑगस्टच्या महिन्यात आंबा उत्पादकांनी पाच महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी कराव्यात याची त्यांनी माहिती दिली.

आंब्याच्या झाडांचं उत्तमरित्या मॅनेजमेंट गरजेचं आहे. आंबे काढून झाले की झाडांच्या सुकलेल्या, रोगट, अशक्त आणि एकमेकांमध्ये घुसलेल्या फांद्या काढून टाकायच्या. जेणेकरून झाडाला उर्जितावस्था येईल. हे जूनच्या पहिल्या 15 दिवसात करावं.

झाड 10 वर्षांपेक्षा मोठं असेल तर 50 किलो शेणखत, दीड किलो नत्र, तीन किलो युरिया, तीन किलो सिंगल सूपर फॉस्फेट, 1 किलो पालाश अशाप्रकारे खत जूनच्या पहिल्या 15 दिवसात दिलं पाहिजे.

झाडाची तब्येत बघून प्रती रनिंग मीटर तीन मिलीग्रॅम किंवा 0.75 घटक या प्रमाणात 15 जुलै ते 15 ऑगस्ट याकाळात पॅक्लोब्युट्राझॉल घालावं.
पाऊस गेल्यानंतर झाडाच्या बुंध्याबाजूची स्वच्छता केली पाहिजे.

पावसानंतर झाडाच्या घेरा खालची जमीन उकरून घ्यावी. जेणेकरून जमिनीतील बाष्प उडून जाईल. अन्नासाठी झाडांची होणारी स्पर्धा थांबेल. झाडाला ताण बसेल आणि थंडीची जोड मिळाली तर, मोहोर चांगला येईल.

पॅक्लोब्युट्राझॉल या रसायनाला बाजारातील भाषेत कल्टार असं म्हणतात. संशोधक सांगतात, आंबे काढून झाले की पुन्हा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोहोर आल्याशिवाय झाडांकडे बघायचं नाही, असं करून चालणार नाही.

आंब्याचा मोहोर का करपतो?
2008 पासून हवामानात अमूलाग्र बदल होऊ लागले. बदलत्या हवामानाचा हापूस आंब्यावर परिणाम होऊन पिक धोक्यात आलंय. हवामानातील चढ-उतारांचा आंब्यावर काय परिणाम झालाय. हे जाणून घेण्यासाठी आम्ही दापोलीच्या गुडघे गावातील आंबा उत्पादक शेतकरी मिलिंद दांडेकर यांच्या बागेत पोहोचलो. साठीतील मिलिंद दांडेकर गेली तीस वर्ष आंब्याची बाग कसतायत. त्यांच्याकडे 550 कलमं आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हवामान बदलाचा आंब्यावर मोठा परिणाम झाला असल्याचं ते सांगतात.

"हवामान बदलामुळे बागायतदारांचे प्रचंड नुकसान होतंय. दव पडल्याने मोहोर काळा पडतो. मोठ्या प्रमाणात फवारणी घ्यावी लागते. त्यामुळे खर्च वाढतो. तापमानात वाढ झाल्यामुळे फळावर एक रुपयाच्या नाण्याएवढा मोठा डाग पडतो," मिलिंद दांडेकर बागेतील झाडांकडे नजर टाकत पुढे सांगत होते. संशोधक सांगतात, गेल्या काही वर्षांत पाऊस मग ऑक्टोबर उष्मा आणि नोव्हेंबर महिन्यात थंडी हे पूर्वीचं ऋतुचक्र बदललंय. दरवर्षी काय बदल असेल हे आता सांगता येत नाही. या तीव्र चढ-उतारांमुळे आंब्यावर परिणाम होतोय.

डॉ. साळवी पुढे सांगतात, "पाऊस उशीरापर्यंत पडतोय. फेब्रुवारी महिन्यातही कडक उन्हामुळे जमिनीतील बाष्पाचं आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने मोहोर करपून जातोय. यामुळे आंब्याच्या हंगामात बदल झाले आहेत." आंब्याला पूर्वी तीन वेळा जोरात मोहोर येत होता. नोव्हेंबरमध्ये 15 ते 20 टक्के, डिसेंबरमध्ये 30 ते 35 आणि जानेवारी महिन्यात 30-40 मोहोर येत असे. डॉ. साळवी पुढे म्हणाले, "हवामान बदलामुळे आंब्याचं पिक हमखास येईल याची खात्री आता सांगता येत नाही."

आंब्याचं उत्पादन 60 टक्के झाल्यास त्याला ऑन इअर आणि 40 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास ऑफ इअर म्हटलं जातं. पण गेल्या काही वर्षांत 30 टक्के आंबा आला तरी चांगलं मानलं जातंय. आंबा उत्पादक तरूण शेतकरी रोहित दांडेकर सांगतात, "हापूस हवामान बदलाला अत्यंत संवेदनशील आहे. गेली दोनवर्ष थंडी नसल्याने मोहोर आला नाही. त्यामुळे उत्पन्नात घट झालीये." पाऊस लांबल्याने नंतरच्या पावसात मोहोर गळून जातो.

झाडाचं आरोग्य कसं हवं?
बदलत्या वातावरणात आंब्याच्या पिकाला वाचवण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने काही प्रयोग सुरू केले. या प्रयोगांवर आधारीत 1200 शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतायत.

या प्रयोगांचा चांगला परिणाम झाल्याने अनेकजण या नवीन प्रयोगांशी जोडले जात आहेत.
संशोधकांच्या मते,
झाड 40 ते 60 वर्षांच्या पुढे गेलं तर त्याचं पुनरुज्जीवन करावं लागतं.
उंच झाडांची छाटणी केल्यामुळे झाडांचं पुनरुज्जीवन होतं. वादळाच्या तडाख्यात झाडं न सापडल्याने नुकसान होत नाही.
तौक्ते आणि निसर्ग चक्रिवादळात कोकणातील आंब्यावर मोठा परिणाम झाला होता. आंबा उत्पादक शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं होतं. त्यात शेकडो वर्षं जुनी झाडं वादळामुळे कोलमडून पडली.

"अवेळी, उशिरा पाऊस या बदलत्या हवामानात पॅक्लोब्युट्राझॉल, म्हणजेच कल्टार या रासायनिक खतांच्या मदतीने हमखास पीक येईल असं तंत्रज्ञान विकसित केलं. आता कोकणातील शेतकरी या बदलत्या वातावरणातही हमखास आंबे घेतोय," डॉ साळवी पुढे सांगत होते.

इंडो-इस्राईल प्रकल्प -
दापोलीच्या मिलिंद दांडेकर यांनी सहा वर्षापूर्वी कृषी विद्यापीठाच्या उपाययोजना आपल्या बागेत राबवण्यास सुरूवात केली. याचा त्यांना चांगला फायदा मिळू लागलाय. "शेतकऱ्याने आंबा वाचवण्यासाठी जागं होणं गरजेचं आहे," मिलिंद दांडेकर म्हणतात. उंच झाडांवर चढून आंबा काढण्यासाठी आता कामगार मिळत नाहीत.
ते पुढे सांगतात, "झाडाची छाटणी केल्यामुळे झाड छोटं झालं. त्यामुळे फळ सहजतेने काढता येतं. फळाचा आकार आणि गुणवत्ता सुधारली आहे." त्यामुळे आधी आंबा कॅनिंगला जायचा. आता बाजारात विकण्यासाठी पाठवता येतोय.

दापोलीतील पाच गावांचा केंद्र सरकारच्या योजनेत समावेश करण्यात आलाय. इंडो-इस्राईल प्रकल्पात याचा समावेश आहे. रोहित दांडेकर यांनीदेखील आपल्या बागेत नवीन बदल केलेत. "आम्ही पहिल्यांदा फक्त चार कलमांचं पुनरुत्जीवन केलं. फळधारणा चांगली झाली. तेव्हापासून दरवर्षी ठराविक झाडांचं पुनरुज्जीवन करण्यास सुरूवात केली आहे.

झाडाच्या मधली फांदी काढली तर, सूर्यप्रकाश आतपर्यंत जाण्यास मदत होते. आंबा हे दरवर्षी आड येणारं पिक असल्याने याची योग्य निगा राखली पाहिजे असं संशोधक सांगतात. रोहित पुढे म्हणतात, "नवीन उपाययोजना करण्याआधी उत्पन्न स्थिर नव्हतं. पण, आता हवामान बदलातही उत्पन्न स्थिर झालंय."

आंब्यासोबत इतर पीक घेतली तर .....
कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या मते आंब्याच्या पिकासोबत शेतकऱ्यांनी इतरही पिकं घेतली पाहिजे. आंब्याच्या दोन झाडांमध्ये लिंबू, केळी, मिरची यांसारखी पिके घेतली तर त्याची उत्पादन क्षमता वाढू शकेल.

डॉ. साळवी सांगतात, आंब्यासोबत इतर पिके घेतली तर त्यांनाही खत-पाणी दिलं जाईल. आंब्याच्या पसरलेल्या मुळांना हे खत-पाणी मिळेल. याचा फायदा आंब्याला होईल. यामुळे 15 ते 30 उत्पन्न वाढतं.
संशोधक म्हणतात, "नियमीत येणाऱ्या आंब्याच्या जातींची 20 टक्के पिकं शेतकऱ्यांनी आपल्या जागेत लावली पाहिजेत. जेणेकरून त्यांना हमखास उत्पन्न मिळेल. आम्ही शेतकऱ्यांना सातत्याने ही शिफारस केलीये."