वरवडे संगम बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवा

Payal Bhegade
30 Nov 2023
Blog

कणकवली : कणकवली शहरातील मराठा मंडळ आणि कनकनगर येथील बंधाऱ्यामध्ये पाणी साठवण केली जात आहे. त्‍याचधर्तीवर तातडीने वरवडे येथील संगम बंधाऱ्यामध्ये पाणी साठा केला जावा, अशी मागणी वरवडे, आशिये, सातरल, कासरल आदी गावातील नागरिकांनी केली आहे.
वरवडे येथील संगमच्या ठिकाणी जानवली आणि गडनद्या येऊन मिळतात. त्‍या परिसरातील वरवडे, आशिये, सातरल आणि कासरल गावांमध्ये उन्हाळी शेती देखील केली जाते. सध्या पाटबंधारे विभागाकडून वरवडेच्या पूर्वेकडील भागातील हरकुळ खुर्द, कनकनगर, मराठा मंडळ आदी भागातील बंधारे बांधले जात आहेत. त्‍याचवेळेच वरवडे संगम येथील बंधाऱ्यामध्येही प्लेट टाकून पाणी अडविण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात आली आहे.
वरवडे संगमच्या पूर्वेकडील भागात असलेल्‍या गडनदीपात्रातील बंधारे बांधून पूर्ण झाले तर वरवडे नदीपात्रात येणाऱ्या पाणीसाठा कमी होणार आहे. परिणामी वरवडे बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा होणार नाही. गडनदीलगतच्या आशिये, सातरल, कासरल आदी गावांमध्ये उन्हाळी शेती केली जाते. येथील अनेक कुटुंबाचा चरितार्थ शेतीवरच आहे. त्‍याचप्रमाणे येथील सर्व गावच्या नळयोजना गडनदीपात्रातील पाण्यावरच अवलंबून आहेत. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्‍या आठवड्यातच गडनदीपात्र आटल्‍याने या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्‍यामुळे येथील बंधाऱ्यात तातडीने पाणी साठा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
वरवडे संगम बंधाऱ्यात पुरेसा पाणी साठा झाला तर येथील नळयोजना आणि खासगी विहिरींनाही मुबलक पाणी उपलब्‍ध होणार आहे. येथील शेतकरी मोठ्या कष्टाने उन्हाळी शेती करत असतात. या भागातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन संगम बंधाऱ्यांमध्ये तातडीने पाणी अडविणे आवश्यक आहे. सध्या गडनदीवरील कणकवली जवळील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्याचे काम सुरू आहे. एकदा या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात आले की नदीपत्रातून वाहणारा प्रवाह बंद होतो. त्यानंतर खालच्या भागातील बंधाऱ्यांमध्ये पुरेसे पाणी साठत नाही. याचाही विचार पाटबंधारे विभागाने करायला हवा .


- रामचंद्र सावंत, माजी सरपंच व प्रगतीशील शेतकरी कासरल