कोकणातील रानभाजी कूडा

Payal Bhegade
19 Jul 2023
Food

कूडा
कूडा ही वनस्पती कोकणात जंगल परिसरात झाडे सर्वत्र आढळून येते.. ही वनस्पती खूप वर्षे जगते. कुड्याचे झाड साधारण तीन ते चार मीटर उंचीपर्यंत वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीस कुड्याच्या झाडावर पांढरीशुभ्र सुगंधी फुले उमलतात. या फुलांचा उपयोग भाजीसाठीही होतो. शेवग्याच्या फुलांची भाजी करण्यासाठी जी पाकक्रिया वापरतात त्याच पद्धतीने कुड्याच्या फुलांची भाजी करतात. किंचित तुरट व कडवट असली तरी ही भाजी चवीला छान लागते. पोटदुखीसारख्या विकारावर ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. फुले कोमेजून गेल्यावर प्रत्येक फुलाच्या देठास एक याप्रमाणे वाल सारख्या लांब शेंगा येतात. मऊ व कोवळ्या शेंगा भाजीसाठी वापरतात. जंगलातून अशा कोवळ्या शेंगा तोडून आणल्यावर स्वच्छ धुतात. त्यामुळे शेंगाना चिकटलेला चिकही निघून जातो. या शेंगा कापल्यानंतर त्यांच्यातील कडवटपणा जाण्यासाठी त्या काही वेळ मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवतात. नंतर या शेंगा घट्ट पिळून त्याची भाजी करतात. मीठाच्या पाण्यात पिळल्याने त्यांच्यातील कडवटपणा जातो. फुलांच्या भाजीप्रमाणेच किंचित कडवट लागणारी भाजी तशी चविष्ट असते. लहान मुलांनी ही भाजी खाल्ली तर पोटात जंत होत नाहीत. पोटदुखीप्रमाणेच तापासारख्या आजारावरही कुड्याच्या शेंगांची भाजी अतिशय गुणकारी आहे. वर्षातून एक दोनदा कुड्याच्या शेंगांची व फुलांची रानभाजी अवश्य खावी. या शेंगा पुढे परिपक्व होऊन तडकून फुटतात. या तडकलेल्या शेंगांमधून म्हातारीच्या केसांसारख्या बिया वाऱ्याबरोबर दूरवर उडत जातात.