कोकणातील रानभाजी सुरण

Payal Bhegade
19 Jul 2023
Food

सुरण
रान सुरण व शेतात लागवड केलेला सुरण असे दोन प्रकारचे सुरण कोकणात सर्वत्र आढळतात. रान सुरण पावसाळ्याची चाहूल लागली की आपोआप उगवतात. घरगुती सुरणाच्या पानांची व कंदाची भाजी करतात. पण रान सुरणाच्या कंदाला खूप खाज असते. दोन्ही सुरणांची झाडे तशी सारखीच दिसत असली तरी घरगुती सुरणाचे खोड व पाने हिरवी व पांढरट असतात, तर जंगली सुरणाचे खोड व पाने हिरवी व काळपट असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस जमिनीखालील मोठ्या कंदांतून एक जाडजूड कोंब उगवतो. साधारण दोन ते अडीच फूट उंचीपर्यंत हा कोंब वाढतो. कोंबाच्या शेंड्यावर गोलाकार पसरलेली लांबट व परस्परांशी संलग्न असलेली पाने येतात. कोंबाच्या शेंड्यावरील तीन ते चार देठांना ही पाने येतात. सुरणाचे झाड छत्रीसारखे भासते. जंगली सुरणाची पाने कोवळी असतानाच कापून व स्वच्छ धुवून ती भाजीसाठी वापरतात. पातळ व सुकी अशी दोन्ही प्रकारची भाजी या पानांची करता येते. या भाजीला खाज असते. त्यामुळे ही भाजी शिजवताना त्यात कोकम किंवा चिंच टाकतात. सुरणाचे कंद खूप मोठेही असतात. जेवढे सुरणाचे आयुष्य वाढत जाते तसा कंदाचा आकार वाढत जातो. घरगुती व जंगली अशा दोन्ही सुरणाच्या कंदांना कमी जास्त खाज असते. कंदाचा तुकडा स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करतात. कंदाची भाजी करताना त्यात कोकम किंवा चिंच टाकावी लागतेच. पावसाळ्यानंतर सुरणाचे खोड व पाने सुकून नष्ट होतात. मात्र जमिनीतील कंद तसाच निद्रिस्त रुपात जीवंत राहतो. पूर्ण वाढ झालेल्या सुरणाचा कंद पंधरा ते वीस किलोग्रॅम वजनापर्यंत वाढतो. मुळव्याध सारख्या आजारावर सुरणाच्या कंदाची व पानांची भाजी अतिशय गुणकारी असल्याचे म्हटले जाते.