हेदवीचा दशभुज गणेश

Payal Bhegade
25 Apr 2023
Devotional

हेदवीचा दशभुज गणेश

कोकण आणि श्री गणेशाचे खास नाते आहे असं म्हणता येईल. गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावा नंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते म्हणजे हेदवीचे दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा कयास आहे. केळकर स्वामी नामक गणेशभक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित रकमेत हरेश्वराचे मंदिर गावात बांधले. मी गेलो होतो तेव्हा मंदिरात पूजा सुरु होती त्यामुळे आतून फोटो काढता आले नाहीत. सभामंडपात जय-विजय द्वारपाल रूपात दिसतात तिथेच केळकर स्वामींच्या पादुकाही आहेत. मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे.
या मंदिरातील गणेश मूर्ती दहा हातांची आहे म्हणूनच या गणपतीला दशभुज गणेश म्हंटलं जातं. चक्र, त्रिशूल, धनुष्य, गदा, आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ, कमळ, पाश, नीलकमळ, दात आणि धान्याची लोंबी अशा गोष्टी हातांत दिसतात. सोंडेमध्ये अमृतकुंभ आहे. अशा प्रकारच्या गणेशमूर्तीचे पूजन सैनिकी कामातील व्यक्तीने करणे अभिप्रेत असते असा संकेत आहे. त्यामुळे दशभुज गणेश मूर्ती सगळीकडे आढळत नाही. या मूर्तीची निर्मिती काश्मीर मधील पाषाण वापरून केली गेली आहे असं सांगितलं जातं. इथं जवळच हेदवीच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन उमामहेश्वराचे दर्शन घ्यायला हवे आणि बामणघळ नावाचा निसर्गाचा अविष्कारही पाहायला हवा. कोकणातील अशाच भन्नाट ठिकाणांची भटकंती करण्यासाठी दर्या फिरस्तीला भेट देत रहा.