कोकणातले वास .....

Payal Bhegade
18 May 2024
Blog

उद्देश एवढाच कि आमच्या गावी कोकणात आम्ही का जातो हे ह्या वासा वरून समजावे....
कोकणातले वास .....
पूर्वी आम्ही कोकणात यायचो ते वेगवेगळे वास डोक्यात भरूनच ....प्रत्येक वेळचा वेगळा वास ...........
दिवसाची सुरवातच मुळी व्हायची ती वेगवेगळ्या फुलांच्या वासाने. मिश्र गोड वास कवठी चाफा , पारिजातक , मोगरा , आबोली , कुंद , गावठी गुलाब ही आणी इतर अनेक सुगंधाने मन वेडावून जायचे .लगोलग चुलीचा ,चुलीवर तापणाऱ्या ताज्या दुधाचा , मऊ भाताचा, कुळीथ पिठल्याचा , सांडगी मिरची तळल्याचा , चुलीच्या धुराचा असा वास पोटातल्या कावळ्यांना फारच काव काव करायला लावायचा .सोबत पिकलेल्या फणसाचा , काजू बोंडांचा , कोकमाचा व आंब्याचा दरवळत असायचा . काय खाऊ काय नको अस वाटायला लावणारा.......
यातून बाहेर येतोय तोवर चुली वरच्या पाण्याचा किंवा बंबाचा वास पसरायचा .आंघोळी आटपेपर्यंत भाकरीच्या वासाने पोटात जागा नसली तरी भूक प्रज्वलीत व्हायला सुरवात व्हायची .चुलीवरची गरम गरम भाकरी , कुळीथाचे पिठले ,चुलीत भाजलेला कांदा , खलबत्त्यात कुटलेली लसुण चटणी , चुलीवरचा गरम गरम मोकळा घरच्या तांदळाचा भात ......आणखी काय हवे ?
दुपारी सकाळपासून उन्हात टाकलेल्या वाळवणाचा वास ओल्या आमसूलाचा वेगळा , रातांब्याचा वेगळा , बियांचा आंबट गोड असा वेगवेगळा वास पसरायला सुरुवात होते.
इतके जेवल्यावर वामकुक्षी हवीच तीही छान गारेगार मातीच्या शेणाने सारवलेल्या जमिनीवर म्हणजे तोही छान वास घेत घेत आडवे व्हायचं .जाग यायची तीच मुळी मस्त ताज्या दुधाच्या वासाने .चुलीवरच्या अगदी typical कोकणातल्य चहाने . खरतर याचे वर्णन तसे कठीणच. थोडासा दुधाळ, गोड unbranded company चां चहा पण इथे तो आवडतो .खरंतर आम्ही दोघे चहाच्या बाबतीत तसे fussy .बाकी जेवण कसही चालतं पण चहा जरा specific कच लागतो .अगदी दूध कमी , साखर कमी आणी तसे म्हटले light tea वाले पण इथला हा चहा मात्र कसाही चालतो .ताज्या दुधाच्या चहाचा वास .......व्वा व्वा ..‌.‌‌
नंतर जरा शेतातून , आमराई तून पडीचे आंबे खाऊन परत पाय मोकळे करून येईपर्यंत ज्यामुळे हे लिहायला बसावेसे वाटले तो धुंद करणारा सुवास खेचून आणतो . तो मिश्र वास असायचा पिकलेले आंबे ,काजू , रातांबे, फणस , कवठी चाफा , रातराणी , अबोली , अनंत अशा सुवासिक फुले , चूलीचा धूर , संध्याकाळी देवापुढे लावलेल्या उदबत्ती यांचा ...
पूर्ण दिवस गेल्या नंतर खरंतर वाटत की आपण काय जेवणार ? पण परत घरातल्या अन्नपूर्णने केलेल्या स्वयंपाकाची वासामार्फत चाहूल लागते आणि तुमचा पराभव होऊन जातो आणि तुम्ही बळी पडता.रात्री झोपताना मस्त रातराणीच्या सुगंधाने परत मन वेडावून जाते............