कोकणी आगर

Payal Bhegade
17 May 2024
Blog

पूर्वी पाटाच्या पाण्यावर विस्तीर्ण जागेत प्रचंड मेहनतीने उभ्या केलेल्या नारळी पोफळीच्या विस्तीर्ण बागांना आगर असे म्हटले जाते . अशी आगरं कोकणात ठिकठिकाणी आजही पहायला मिळतात . बागायतदारांचे जेवढे आपल्या मुलावर प्रेम तेवढेच आगरावर आणि त्यातील प्रत्येक झाडावर . आगराचे एकूण क्षेत्र किती आहे , त्यामध्ये पोफळीची आणि नारळीची झाडे किती आहेत , यातील लागणारी किती आहेत तसेच अन्य कोणकोणती झाडे आहेत याची तोंडपाठ माहिती बागायतदारकडे असते . याचं मुख्य कारण म्हणजे बागायतदाराने या आगराच्या जमिनीत आपला घाम गाळलेला असतो . आगर म्हणजे बागायदाराचे जणू हृदयच असते . दिवसातून किमान तीन खेपा या आगरात व्हाव्याच लागतात . घरात कोणी आले आणि घरमालकाची चौकशी केली तर मंजूळ आवाजात येणारे उत्तर ' ते ' आगरात गेलेत . आलेल्या माणसालाही घरात बसण्यापेक्षा आगरामध्ये जाण्यातच अधिक रस असतो . आगरात भेटीसाठी गेलेला माणूस हातात एखादा भलामोठा नारळ नाहीतर अननस अशी भेट घेऊनच परततो . शिवाय पान खाण्याच्या निमित्ताने दोन्ही खिशात अलगद सात आठ पोफळ जावून विराजमान होतात ते वेगळंच . एकूण काय , आगरात गेलेला माणूस कधीही रित्या हाताने परतत नाही . मग तो ओळखीचा असो अथवा नसो . कोकणी माणसाकडे हे असे भरभरून देण्याचे दातृत्व आहे . कोकणी माणसाला अशोभनीय अशा वेगवेगळ्या उपमा दिल्या जातात . मात्र त्या पलीकडील कोकणी माणूस अनुभवायचा असेल तर , थेट त्याच्या हृदयातच स्थान मिळवावे लागते . आगरा सारखी विशालता कोकणी माणसाच्या मनात असते , येथे असलेली समृध्दी , दातृत्वाच्या रुपाने त्याच्या हातात असते . आगरातील वृक्ष उंच गेल्यावर पडणारी त्यांची सावली बागायतदाराच्या रुपाने त्याच्या घरावर असते . आगरातील शीतलता कोकणी माणसाच्या घरात पसरलेली असते .
कोकणी माणूस हा दिसायला साधाभोळा असला , तरी त्याच्याकडे कमालीची कल्पकता असते . फणस हातात घेतांना काटे लागले , तरी आतील गऱ्यांची मधुरता अन्य कशात नाही . कोकणी माणूस काहीसा असाच असतो , त्याच्या बोलण्यातून – स्वभावातून तो असा भासला , तरी त्याच्या अंतरंगात गऱ्यांसारखी मधुरता भरलेली असते . बोलण्यातील तिरकसपणा हा त्याला जन्मजात किंवा काहीवेळा अनुभवाने प्राप्त झालेला असतो . या तिरकसपणाचा कोकणवासीय अभिमान बाळगत नसले , यावर त्यांच्या नावे फार पूर्वी शिक्कामोर्तब झालेले आहे . कष्ट हे त्याच्या नशीबी लिहूनच ठेवलेले असतात . मात्र कष्टातून अपेक्षित यश प्राप्त झाले नाही , तर तो थकून न जाता नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न करतो . सरकार मग ते कोणाचेही असो , ते आपल्याला नुकसानभरपाई देइल या संकल्पनेवर त्याचा विश्वासच नसतो . त्यामुळे नव्याने उभे रहाण्यासाठी त्याच्याकडे पर्यायी नियोजन तयार असते . कोकणी माणसाच्या दृष्टीने समृध्दीची व्याख्या काय असते ? तर विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेले हिरवेगार ' आगर ' . या आगरात बसल्यानंतर माणसाला क्षणात स्वर्ग सुखाची अनुभूती मिळते हीच कोकणवासीयांच्या दृष्टीने खरी समृध्दी असते .
मांडवावर , अंगणात जिकडे जागा मिळेत तिकडे केशरी रंगाची पोफळं वाळत पडलेली दिसणं , म्हणजे समृध्दी . पाणछपराच्या एका बाजूला दाटीवाटीने पहूडलेले शेकडो नारळ आणि पाणचुलीजवळ एकावर एक थराने रचलेली नारळाची सोडणं म्हणजे खरी समृध्दी . ही सारी त्या आगराची देण असते . यामुळेच आगर हे बागायतदाराचे दुसरे समृध्द घर मानले जाते . नारळी - पोफळीच्या रांगा म्हणजे खांब आणि भिंती , तर त्यावरच्या हिरव्यागार झावळांची सावली म्हणजे छत . या आगरात पाण्याने आलेला गारवा एखाद्या वातानुकूलित यंत्रणेला लाजवेल एवढी शीतलता देणारा असतो. सुकून पडलेली झाऊळ काही वेळातच बाजूला केली जाते . सततच्या पाण्याने वृक्षांच्या मुळाशी उगवणारे तण बाजूला करायचे काम आगरात कायम सुरुच रहाते . आगरात असणारी एखादी छोटीशी खोपटी या समृध्दीमुळे अगदी राजवड्या समान असल्याची जाणीव होते . आगर स्वच्छ ठेवणे , हे स्वतःच्या स्वच्छते पेक्षाही बागायतदार अधिक महत्वाचे मानतो . आगराची उभारणी ही यातील भरघोस उत्पन्नातून चरितार्थ चालविण्याच्या हेतूनेच केली जायची . यासाठी आजोबा – पणजोबांनी घेतलेली मेहनत ही शब्दातीत असे .
मुबलक पाणी आणि नारळी पोफळींसाठी पोषक वातावरण असले की , आगर उभे रहातेच . यासाठी नारळी – पोफळीची उत्तम प्रतिची रोपे आणून या आगराचा विस्तार करण्याचे काम पुढची पिढी करते . नारळी – पोफळीला लावल्या जाणाऱ्या पाण्यावर आणखी काही आंतरपिक घ्यावे म्हणून झाडांवर काळ्यामिरीच्या वेली सोडल्या जातात . याच बरोबर उत्तम दर्जाच्या अननसाचीही लागवड करुन उत्पन्नात भर घालण्याचे महत्वपूर्ण काम केले जाते . आगर अशा अनेक गोष्टींनी समृध्द बनल्यानंतर बागायतदारही समाधानी बनतो . पोफळीची शिपटं तयार झाल्यानंतर त्यांना प्राप्त होणारा केशरी रंग बागायतदारासाठी जणू त्यागाचे प्रतीक बनलेला असतो . हारे भरुन ही पोफळं घरात आली की , याच्या सालींचा येणारा गंध , धूंद करणारा ठरतो . अशी समृध्दी घरी आल्यानंतर घरातील स्त्रीला एखादा दागिना मिळाल्यानंतर होत नाही एवढा आनंद होतो . या भरघोस पिकातूनच पुढे आपल्याला एखादा दागिना लाभणार आहे , याची कल्पना व्यवहार कुशल घरातील चतुर स्त्रीला असते हा भाग वेगळा . यातूनच आलेली एखादी ओली सुपारी कानशिले तापवण्यासाठी पुरुष वर्ग आवर्जून खातो आणि दुसऱ्यालाही देतो .
आगरात जावून चटणी भाकरी खाणं यासारखे दुसरे सुख ते कोणते ? निसर्गाच्या सान्निध्यात बसल्यानंतर चार घास नव्हे खूपच घास जास्त जातात , याची अनुभूती आगरात जेवायला गेल्यानंतर येते . उन्हाळ्याच्या हंगामात कोकणवासी ठरवून दुपारचे जेवण अनेकदा आगरात घेतो . वाऱ्याच्या मंद लहरींसोबत , एकमेकांजवळ उत्तम संवाद साधत एकत्र बसण्याचा आनंद काही औरच असल्याची प्रचिती येथे येते . आगरात कोठेही वामकुक्षी घ्यायची ठरवलं तर दाट सावली असतेच . एखादा गोणता पसरुन त्यावर ताणून दिल्यास घरात गादीवर लागणार नाही , एवढी सुखाची झोप लागते. आगरात कोणतेही काम करतांना थकायला होत नाही . डोक्यावर असणारी दाट सावली अंगातून घाम येवूच देत नाही . त्यामुळे आगरात काम करायला मजूर देखील आनंदाने राजी असतात . आगर असणाऱ्या घरात सोलकढी , नारळाची चटणी , शहाळं आदि मुबलक उपलब्ध असते . याशिवाय फावल्या वेळात घरातील स्त्रीया अन्य माणसे पडलेल्या झावळांचे हिर काढण्याचे काम करतात . या हिरांपासून उत्तम दर्जाच्या झाडू बांधण्याचे काम पुरुषवर्ग करतो . यांचीही खूप चांगली विक्री होते . आगर बागायतदाराला खूप काही देत असते . म्हणूनच आगरावर त्याचे पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम जडलेले दिसते . आगर हे तेवढ्या भागापुरते एक थंड हवेचे ठिकाण बनून जाते . एकदा आगरात येवून गेलेला माणूस परत परत येण्यासाठी आगराच्या प्रेमात पडतो , तो काही उगाच नाही .