किल्‍ले रायगडचा इतिहास डिजिटल स्‍वरूपात; थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर

Payal Bhegade
12 Dec 2023
Blog

स्वराज्याची राजधानी असलेल्‍या रायगड किल्ल्यावरील विविध ऐतिहासिक वास्तू, किल्‍ल्‍याचा इतिहास आता शिवप्रेमींना डिजिटल स्वरूपात पाहता येणार आहे. सी-डॅक व्यवस्थापनाबरोबर रायगड प्राधिकरणाने करार केला असून भविष्यात किल्ल्यावरील वास्‍तूंची पाहणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येणार आहे.
रायगड विकास प्राधिकरण व सी-डॅक यांच्यात शुक्रवारी (ता. ८) तंत्रज्ञानाविषयक करार झाला आहे. देशात एखाद्या किल्ल्यासंदर्भात होणारा हा पहिलाच करार आहे. या वेळी रायगड विकास प्राधिकरण अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे आणि सी-डॅकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश नेमाडे, माजी कर्नल ए. के. नाथ यांनी करारावर सह्या केल्या आहे. यामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

सामंजस्य करारामध्ये अनेक बाबींचा समावेश असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किल्ले रायगडावरील छत्रपतींच्या काळातील विविध स्थाने शिवप्रेमीना योग्य पद्धतीने पाहता येणार आहेत. व त्या काळातील ऐतिहासिक वास्तवाचे चित्रण समोर येईल. दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने दुर्गराज रायगडवर काम करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘थ्रीडी वॉक थ्रू’ या तंत्रज्ञानाच्या साह्याने रायगड किल्ला शिवकाळात होता, तसा व्हर्चुअल रूपात उभा केला जाणार आहे. यासाठी सर्व इतिहास संशोधकांनी मदत घेतली जाणार असल्याने रायगड किल्ल्‍याचे शास्‍त्रीय जतन व संवर्धनासाठी मोठा माईलस्टोन ठरणार आहे.

मोबाईल टुरिस्ट गाइड :-
तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि विशेष मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे किल्ले रायगडवरील सर्व ऐतिहासिक इमारतींची माहिती शिवप्रेमींना मिळणार आहे. त्यासाठी किल्ल्यावर ठिकठिकाणी सेन्सर लावण्यात येणार आहेत. रायगडाला भेट देणाऱ्या शिवप्रेमी व पर्यटकांसाठी किल्ल्यावर सी-डॅकतर्फे अनुभव कक्ष उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्‌या स्‍क्रीनवर पर्यटकांना किल्‍ल्‍याची इत्थंभूत माहिती मिळेल तसेच ऐतिहासिक प्रसंग अनुभवता येतील.

गडकिल्ले व छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित राज्यातील व देशातील सर्व दुर्मिळ कागदपत्रांचे डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार आहे. शिवरायांशी संबंधित सर्व ऐतिहासिक कागदपत्रे एकाच पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उभ्या राहणाऱ्या शिवसृष्टी केंद्राचा एक भाग असेल.