मालवण, रत्नागिरी, देवगडसह कोकणातील किनारी भागांसाठी खास योजना; PM मोदींची घोषणा

Payal Bhegade
05 Dec 2023
Blog

तारकर्ली : भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालवण इथं आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं उद्धाटन पार पडलं. यानंतर उपस्थितांना आणि विशेषकरुन कोकणवासियांना संबोधित करताना मोदींनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये रत्नागिरी, देवगड, मालवण या किनारी भागांच्या विकासकामांचा समावेश आहे.

मोदी म्हणाले, सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ आता सुरु झालं आहे. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर माझगावपर्यंत जोडणार आहे. इथल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील विशेष योजना बनवण्यात येत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील रहिवासी भागांना वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी मँग्रुव्ह्जचा भाग वाढवण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारनं यासाठी विशेष 'मिश्टी' योजना (Mangrove Initiative for Shoreline Habitats & Tangible Incomes) बनवली आहे.

ज्या मिश्टी योजनाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला ती योजना ५४० स्वेअर किमी अंतरावर राबवली जाणार आहे. यामध्ये ११ राज्यांमध्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशात मँग्रुव्हजचा विकास केला जाणार आहे. यामध्ये कोकणचाही सहभाग आहे.

मोदी पुढे म्हणाले, यामध्ये मालवण, आचरा, रत्नागिरी, देवगड, विजयदुर्गसहित महाराष्ट्रातील अनेक साईट्सना मँग्रुव्हज मॅनेजमेंटसाठी निवड करण्यात आली आहे. यामुळं वारसा आणि विकास हाच विकसित भारताचा मार्ग आहे. त्यामुळं या क्षेत्रात आपल्या गौरवशाली परंपरेच्या संरक्षणाचा प्रयत्न केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महराजांच्या काळात जे जलदुर्ग बनवले गेले त्यांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रात यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. आमचा प्रयत्न आहे की देशभरातून लोकांनी आपला हा गौरवशाली वारसा पहायला आलं पाहिजे. इथून आपल्याला विकसित भाराताची यात्रा अधिक तीव्र करायची आहे.