कोकणातील माजगावचा सात सावंतांचा गणेशोत्सव

Payal Bhegade
12 Sep 2023
Festival

जिल्ह्यात गणपती सण जसा उत्साहात साजरा केला जातो त्याच उत्साहात पूर्वी परंपरेने चालत आलेल्या रूढी परंपरा ही आजच्या एकविसाव्या शतकात काळजीपूर्वक जोपासल्या जात आहेत. माजगाव येथील सात सावंत - खोत घराणे अशीच एक परंपरा अकरा पिढ्यांपासून जोपासत आहे. पूजन करण्यात येणारा गणपती हा मातीच्या 21 गोळ्यांचाच असावा व एकाच माटवीखाली दुसरा गणपती पुजनाचा मामाने भाच्याला दिलेला मान हे कुटुंब आजही पार पाडत आहे. म्हणुनच जिल्ह्यात सात सावंतांचा गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण म्हणुन ओळखला जातो.

सावंतवाडी शहरानजीक माजगाव गावी सात सावंत खोत घराणे हे पूर्वापार गणपती उत्सव साजरा करीत आले आहेत. ही परंपरा सुमारे दहा ते अकरा पिढ्यांपासून सुरू आहे. या घराण्याच्या मूळ पुरुषाचे नाव सातू सावंत होते. त्यावरून या घराला सात सावंत, असे नाव पडले. दरवर्षी याठिकाणी असलेला उत्साह घरातील मंडळीचा एकोपा व होणारे कार्यक्रम यामुळे या घराण्याच्या गणपती उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सात सावंतांच्या गणपतीचे वैशिष्ठ असे की पूजन करण्यात येणारा गणपती हा मातीच्या 21 गोळ्यांपासूनच आजही बनविला जातो. सुरवातीला या गणपतीची मूर्ती घडविणारा कलाकार हा गावातील कुंभार सांगवेकर नावाचा होता. त्यावेळी मूर्ती घडविण्याचा मोबदला म्हणुन सावंत कुटुंबाने गावात आपल्या मालकीची जमीन दिलेली आहे. गणपतीसाठी लागणारा रंग, तेल, वात आदी साहित्य त्यावेळचे दुकानदार व्यापारी श्री. नाटेकर देत असत. गणपतीसमोर नाच, गायन करणाऱ्या कलावंतांनाही या कुटुंबाने जमिनी दिल्या आहेत. गणपतीची सर्व व्यवस्था परंपरागत चालू राहावी हाच या मागचा मुख्य हेतू होता, असे आजची पिढी सांगते.

काळाच्या ओघात यातील काही पद्धत आता कालबाह्य झाल्या आहेत. गणपतीची मूर्ती करण्याचे काम कुंभार सांगवेकर यांच्याकडे होते; पण त्यांच्याकडे कोणी कलाकार न उरल्याने 1967 पासून सात सावंत घराण्यातील काही ज्ञानी पुरुषांनी स्वतः मूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे; मात्र मूर्ती घडविताना ती 21 असावी याची काळजी आजही घेतली जाते. त्यासाठी सात सावंत घराण्यातील काका व तरुण वर्ग परिश्रम घेतात. यापूर्वी ही मूर्ती चंद्रकांत सावंत बनवत असत. अवजड भली मोठी मूर्ती उत्सवाकरिता घरात नेणे व विसर्जनासाठी महादेव मंदिरानजीक 1 किलोमीटर अंतरावर नेणे ही महत्त्वाची शक्तीची बाजू होती. त्यावेळी सशक्त माणसे असल्याने एवढी अवाढव्य मूर्ती ते उचलू शकत. प्रथम मुख्य घरातून मूर्ती अंगणात आणून मूर्तीच्या चौरंगाला दोन्ही बाजूने लाकडी वासे बांधून सुमारे 20 ते 25 जवान खांद्यावर मूर्ती घेऊन नंतर "गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीने गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीने सातेरी मंदिर मार्गे महादेव मंदिराकडील तलावाकडे नेला जात असे; मात्र आता यासाठी आधुनिक रथाचा वापर केला जातो.

येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळच्या सावंत घराण्याच्या मूळ पुरुषाने तांबोळी येथील आपला भाचा देसाई यांना धार्मिक अडचण होऊ नये, म्हणून येथे स्थायिक केले होते व गणपतीबरोबर एकाच माटवीखाली श्री. देसाई यांनाही घरचा गणपती पूजेस अनुमती दिली. आजही ही प्रथा सुरू असून देसाई व सावंत कुटुंबीय एकत्र येत ही परंपरा जोपासत आहे.

या घराण्यात आज एकूण 45 स्वतंत्रपणे राहणारी कुटुंबे असून प्रत्येक कुटुंबाची उत्सवाची वर्गणी ठरलेली असते. यामुळे आजच्या महागाईत या प्रत्येक कुटुंबाचा वार्षिक खर्च प्रत्येकी दहा ते बारा हजारा एवढा वाचू शकतो ही समाधानाची बाजू आहे. पूर्वी या सात सावंतांच्या कुटुंबात एकूण चार भाऊ होते व ते एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असत. कुटुंब प्रमुख म्हणून राघु अर्जुन सावंत काम पाहत असत. त्यांच्यानंतर काकू सावंत नंतर रामचंद्र सावंत नंतर वामन सावंत त्यानंतर के. व्ही. सावंत त्यांच्या पश्‍चात आता माजगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. के. सावंत हे घराण्याचे प्रमुख म्हणून आहेत. त्यांच्या सल्ल्याने या सात सावंन घराण्याचे सर्व प्रकारचे कार्यक्रम पार पाडले जातात.

सात दिवसांचा गणपती
सात सावंत कुंटूबाचा वैशिष्ट्यपूर्ण असलेला गणेशोत्सव हा दरवर्षी सात दिवसांचाच असतो; मात्र या सात दिवसात येथील उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद काहीसा वेगळाच असतो.