ऊर्जा देणारा उत्सव गणेशोत्सव

Payal Bhegade
06 Sep 2023
Festival

कोकणातील गणेशोत्सवाची तयारी
पावसाळा सुरू होऊन भातलावणी वगैरे झाली, की कोकणात घराघरांतून बाप्पासाठीचे पाट मूर्तीशाळेत पोहोचते केले जातात. वेगळ्या प्रकारची मूर्ती नको असेल, तर मूर्ती कशी हवीय हे सांगावंही लागत नाही मूर्तीकाराला. कारण त्याचं वर्षानुवर्षांचं गणित डोक्यात पक्कं बसलेलं असतं.
गणेशोत्सव सगळ्या देशभरात साजरा केला जात असला, तरी महाराष्ट्रात त्याचा थाट काही औरच असतो. महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं, की प्रदेश बदलतो त्याप्रमाणे या उत्सवाचं स्वरूपही बदलतं. मुंबईत मोठमोठ्या मूर्तींचं अप्रूप, पुण्यात वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या मंडळांद्वारे साजरा होणारा उत्सव, सांगलीतल्या संस्थानाचा राजेशाही थाट, कोकणात घरोघरी येणाऱ्या बाप्पांचा पाहुणचार, याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा अशा प्रत्येक भागांत गणेशोत्सव वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. दैवत एकच, पण त्याच्या पूजा-अर्चनेच्या किती या वैविध्यपूर्ण परंपरा!
या सगळ्यात कोकणातल्या गणेशोत्सवाचं स्थान निश्चितच वेगळं आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी जाऊन स्टॉलवरून मूर्ती विकत आणण्याची पद्धत इथे नाही. इथे प्रत्येक गावात, निदान मोठ्या गावांत तरी मूर्तीशाळा हमखास असते आणि प्रत्येक घराची मूर्तीशाळा/मूर्तीकारही परंपरागत ठरलेला असतो. पावसाळा सुरू होऊन भातलावणी वगैरे झाली, की घराघरांतून बाप्पासाठीचे पाट मूर्तीशाळेत पोहोचते केले जातात. वेगळ्या प्रकारची मूर्ती नको असेल, तर मूर्ती कशी हवीय हे सांगावंही लागत नाही मूर्तीकाराला. कारण त्याचं वर्षानुवर्षांचं गणित डोक्यात पक्कं बसलेलं असतं.
दोन महिने अक्षरशः रात्र आणि दिवस एक करून हे मूर्तीकार बाप्पाची वेगवेगळी रूपं साकारतात. काही साच्यातून, तर काही हातीही. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत आता इतकी जनजागृती केली जातेय; पण कोकणातला गणेशोत्सव पहिल्यापासूनच बहुतांशी पर्यावरणपूरक आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्गात स्थानिक लाल मातीपासूनच गणपती साकारले जातात. रत्नागिरी जिल्ह्यात शाडूची माती वापरण्याचं प्रमाण अधिक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या दोन्ही जिल्ह्यांत अगदी अलिकडेच दिसू लागल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी घरातल्या बाळगोपाळांसह मोठ्या माणसांचा ताफा निघतो चित्रशाळेकडे. आपापल्या बाप्पाच्या पाटापुढे उदबत्त्या लावून, नारळ/विडा ठेवून, आणि मूर्तीकाराचं मानधन ठेवून पाट डोक्यावर उचलला जातो. दिवस सरतो आणि दोन महिने बाप्पांची वेगवेगळी रूपं भरून राहिलेली मूर्तीशाळा रिती होते; पण तिथला आनंद आता घराघरांत पसरला गेलेला असतो, पुढच्या दहा दिवसांसाठी.

वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार भातशेतं, त्यांच्या मधल्या लाल मेरेवरून (बांध) किंवा वाटेवरून डोक्यावर गणपती घेऊन चाललेली माणसं आणि त्यांच्या मागे-पुढे चिमुरड्यांची लगबग..हे दृश्य म्हणजे कोकणातल्या गणेशोत्सवाचा अगदी ‘ट्रेडमार्क’च आहे. दहा दिवस मनोभावे गणेशाचं पूजन, अथर्वशीर्षाची आवर्तनं, बाप्पाच्या नैवेद्यासाठी तांदळापासून केलेले वेगवेगळे गोड पदार्थ, भजन-कीर्तन, साग्रसंगीत आरत्या आणि जोडीला अधून-मधून जोरदार कोसळणाऱ्या पावसाची साथ, असा सगळा माहौलच मनामनाला सुखावून टाकणारा, प्रफुल्लित करणारा असतो. म्हणूनच कोकणातून नोकरी-धंद्यासाठी बाहेरगावी गेलेला चाकरमानी हटकून गणेशोत्सवासाठी दोन-तीन दिवस तरी वेळ काढतोच. कारण पुढच्या अख्ख्या वर्षभराच्या धडपडीची ऊर्जाच हा उत्सव सगळ्यांना देत असतो.