श्री. गजबादेवी मंदिर

Payal Bhegade
06 Jul 2023
Devotional

श्री. गजबादेवी मंदिर .
नारळ, फोपळीच्या बागा आणि उंच - उंच सुरूची झाडे यामुळे अगदी हिरवागार किनारा शालूचा पेहराव केलेला दिसतो. येथील गजबा देवीचे स्थान हे मुख्य रस्त्यापासून ५ कि. मी. अंतरावर आत आहे.
गजबीदेवी मंदिर अगदी श्री. शंभू कुणकेश्वर मंदिराप्रमाणेच किना-याच्या टेकडीवर वसलेले आहे. तिच्या पायथ्याशी पांढरा शुभ्र किणा-याच्या अंगावर शहारे आणणा-या त्या फेसाळ लाटा व बाराही महिने वाहाणारा वारा अगदी मन मोहून घेतो. तीन बाजूंना हिरवेगार डोंगर आणि पश्चिम बाजूला समुद्र. देवगडहून १८ कि. मी. अंतरावर असलेले हे मंदिर. या मंदिराचा प्रथम जिर्णोद्वार शालिवाहन शके १८४२ रौद्र नाम संवत्सर माघ शुद्ध एकादशी, शुक्रवार तारिख १८माहे १९२१ रोजी करणयात आला. पुणे, कोल्हापूर, विजयदुर्ग मार्गे मिठबांवमध्ये वस्तीसाठी अालेल्या फाटक व कुबल यांनी सुमारे २०० वर्षापूर्वी गजबादेवीची स्थापना केली. हे मूळ आद्यस्थान आहे.
गजबादेवी जिर्णोद्वार प्रथमत: फाटक, मिराशी, गांवकर यांनी केला. समुद्रालगत डोंगरावर समुद्राच्या लाटांनी मंदिराची जागा खचत असते. त्यामुळे या मंदिराचा पुन्हा जिर्णोद्वार मिठबांव गावचे सुपुत्र रविंद्र फाटक यांनी १९९७ साली दुस-यांदा देवीचे सुंदर मंदिर बांधून केला. सध्या पूजेत असलेली गजबादेवीची मूर्ती नित्य पूजा अर्चा होत असल्याने जिर्ण झाल्याने सन २००० मध्ये फाटक बंधूनी शास्त्रोक्त वज्रलेप करून देवीची मूर्ती सुबक केली आहे. फाटक समाज या देवीला कुलदेवता म्हणून पूजा करतो. या मंदिराच्या समोर एक आकर्षक दीपमाला आहे. या दीपमालेवर एक भगवा ध्वज आहे. हा भगवा ध्वज दूरवरून पाहिल्यास मंदिर असल्याचे जाणिव होते. या मंदिराच्या डाव्या बाजूस दांडगाई देवीचे छोटे मंदिर आहे. समोरच एक भव्य कमान व औदुंबराचा जुनाट पूर्वीच्या काळातील वृक्ष आहे. त्याठिकाणी एक दीपमाळ आहे. दीपमाळेवर ध्वज आहे. येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या गजबादेवी मंदिराच्या सुशोभिकरणासाठी मिठबांववासीय व कातवणवासीय लोकांनी हातभार लावला आहे. या मंदिराच्या ठिकाणी सूर्यास्त कसा होतो हे पूर्णपणे डोळ्यादेखत पहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे प्राचीन काळातील देवदेवतांच्या मंदिरांचा एक खजाना आहे. त्यापैकी गजबादेवी ही जामसंडेची श्री. दिर्बादेवी हिची बहिण आहे. असे म्हटले जाते.
प्रतिवर्षी या मंदिरांमध्ये १८ मे रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा होते. या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या अ़उत्साहातसाजरा केला जातो.
देवगडपासून ३० कि. मी. असलेल्या मिठबांवपासून ३ कि. मी. अंतरावर एका टेकडीवर श्री. गजबादेवी मंदिर आहे. येथून तांबळडेग १ कि. मी. अंतरावर आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, अतिशय विशाल व रम्य किनारपट्टी लाभलेल्या टेकडीवर देखणे मंदिर आपल्याला पहावयास मिळते. हे नमंदिर पुरातन आहे. शेजारीच रम्य तांबळडेग बीच असून मंदिर परिसरातून दिसणारा रम्य सागर किनारा, सुरूचे बन , निळाशार अरबी समुद्र अाणि सुर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पहाण्यासारखे आहे.पायथायाशी सपाट कातळ पसरलेले असून त्यात जीवशास्त्र आकर्षितकरणारे विविध जीव व शैवाल, शंख शिंपले सापडतात. सायंकाळी ५ वाजल्यानंतर पर्यटक तसेच भाविकांची मोठी वर्दळ असते. प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिरापासून अगदी ८ कि. मी. अंतरावर असलेला तांबळडेग समुद्र किनारा .
कुणकेश्वरवरून निघाल्यानंतर कातवण पार केल्यावर मिठबांव हद्दीमध्ये टेंबावर एक गोरक्ष गणपतीचे स्थान आहे. त्याठिकाणी एवढ्या सुंदर निसर्गाचे दर्शन होते की, मन अगदी प्रसन्न होऊन जाते. मग मिठबांव गांव. या गावातून वेडीवाकडी वळणे घेऊन सरळ जाणारा रस्ता तांबळडेगला, मात्र त्याच्या अलिकडेच एक कच्चा रस्ता गेलेला आहे. त्या रस्त्याने सरळ गेल्यास गजबादेवी मंदिर बाजूला तांबळडेग समुद्र किनारा सुरूच्या वृक्षांमुळे नयनरम्य असाच आहे.
या मंदिरामधून दिसणारा रम्य असा सागर किनारा, सुरूंचे बन, निळाशार समुद्र व सुर्यास्ताचे विलोभनीय दर्शन हे एक पर्यटकांसाठी पंढरीच आहे.
कथा - पेज - देवाचा " गड " देवगड.